Type Here to Get Search Results !

धाराशिव जिल्हा परिषदेत 'सहली'चे राजकारण; महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आमदार पाटील यांची 'फिल्डिंग'

 


धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी सदस्यांना 'सहलीवर' पाठवण्यात आले आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाल्याने भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

विरोधकांच्या हालचालींपूर्वीच भाजपची बाजी

जिल्ह्यातील वजनदार नेते आणि माजी मंत्री, आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा गट सक्रिय होण्यापूर्वीच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सावध पवित्रा घेतला आहे. महायुतीचे संख्याबळ भक्कम करण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद सदस्यांना एकत्रित करून सुरक्षित स्थळी सहलीवर पाठवले आहे. यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

राहुल मोटे यांची साथ; परंडा तालुक्याला संधी मिळणार?

या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार राहुल मोटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंडा, भूम आणि वाशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सदस्यांना त्यांनी आमदार पाटील यांच्या स्वाधीन केले आहे.

विशेषतः परंडा तालुक्यातून एकमेव निवडून आलेले राष्ट्रवादीचे सदस्य भाऊसाहेब खरसाडे हे देखील या सहलीत सामील आहेत. खरसाडे हे राहुल मोटे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळे आगामी काळात परंडा तालुक्याला सत्तेत मोठी संधी मिळावी, यासाठी राहुल मोटे हे आमदार पाटील यांच्याकडे आग्रही राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात चर्चांना उधाण

आमदार तानाजी सावंत यांच्या गटाला खिंडार पाडत किंवा त्यांना संधी मिळण्याआधीच आमदार पाटील यांनी केलेली ही तटबंदी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. अर्चना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की परंडा तालुक्याला काही अनपेक्षित संधी मिळणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या