परंडा तालुक्यातील आसु येथे शेतात अफूची शेती उघड; ३६ झाडे जप्त, एकावर कारवाई
तालुक्यातील आसु परिसरात एका शेतकऱ्याने कांद्याच्या पिकात लपवून केलेली अफूची लागवड पोलिसांनी छापा टाकून उधळून लावली आहे. या कारवाईत सुमारे १९,५९० रुपये किमतीची अफूची ३६ लहान-मोठी झाडे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनाला गुप्त माहिती मिळाली की, मौजे आसु येथील शेतकरी जयजयराम सुबराव जाधव यांनी आपल्या शेतात प्रतिबंधित अफूच्या झाडांची लागवड केली आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून संबंधित शेतात छापा टाकला.
पोलिसांनी शेताची पाहणी केली असता, मुख्य पिकाच्या (कांदा) आडोशाला लपवून लावलेली ३६ अफूची झाडे मिळून आली. या झाडांचे एकूण वजन १ किलो ३०६ ग्रॅम भरले असून, बाजारभावाप्रमाणे याची किंमत १९,५९० रुपये इतकी आहे. घटनास्थळी भूम विभागाच्या मोबाईल फॉरेन्सिक टीमनेही भेट देऊन तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत.
ही धडाकेबाज कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत अमना, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले (भूम) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत आसाराम चोरमले (पोलीस निरीक्षक, परंडा), बाळासाहेब खरात (पोलीस उपनिरीक्षक), शिवाजी राऊत (पो. हवा.), दिलीप पवार (सपोउपनी), सूर्यजित जगदाळे (पो. कॉ.), साधू शेवाळे, सागर सलगर, मंडळ अधिकारी आबासाहेब सुरवसे, ग्राम महसूल अधिकारी शिंदे आणि पोलीस पाटील इथापे यांसह अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
सध्या आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही परंडा पोलीस ठाण्यात सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध अमली पदार्थ लागवड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या