परंडा शहरात गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या परिस्थितीला जनशक्ती आघाडीचे पाणीपुरवठा सभापतीच सर्वस्वी जबाबदार आहेत. जर त्यांना काम झेपत नसेल तर त्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी रोखठोक मागणी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी केली आहे.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष सौदागर बोलत होते. यावेळी त्यांनी जनशक्ती आघाडीच्या नियोजनशून्य कारभारावर जोरदार प्रहार केला.
'सभापतींनी रशीद तांबोळींकडे ट्युशन लावावी'
नगराध्यक्ष सौदागर पुढे म्हणाले की, "शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात सभापती पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांना पाणीपुरवठा विभागाची तांत्रिक माहिती नसेल, तर त्यांनी माजी पाणीपुरवठा सभापती रशीद तांबोळी यांच्याकडे जाऊन तांत्रिक कामाचे धडे गिरवण्याची (ट्युशन लावण्याची) गरज आहे. केवळ पदे भूषवून चालणार नाही, तर जनतेला मूलभूत सुविधा देणे हे लोकप्रतिनिधींचे प्राथमिक कर्तव्य आहे."
केबिनच्या वादातून अधिकाऱ्यांची बदनामी
शहरातील स्वच्छता, आरोग्य, पथदिवे आणि पाणीपुरवठा या सर्व महत्त्वाच्या समित्या जनशक्ती आघाडीकडे आहेत. असे असतानाही विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सौदागर यांनी केला. उपनगराध्यक्षांसाठी स्वतंत्र केबिनची मागणी जनशक्तीच्या १२ नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव केबिन मिळण्यास अडचण आल्याने हे सर्व नगरसेवक आता एकत्र येऊन मुख्याधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहेत, असा खळबळजनक दावाही नगराध्यक्षांनी यावेळी केला.
सत्ताधारी गटातच जुंपली
जनशक्ती आघाडीचे नगरसेवक सत्तार पठाण (झोल बाबा) यांनी 'मुख्याधिकारी दोन-दोन महिने गैरहजर राहत असल्याने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत' असे विधान केले होते. या विधानाचा समाचार घेताना नगराध्यक्षांनी विकासकामातील अपयशाचे खापर प्रशासनावर फोडले जात असल्याचे सूचित केले. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शहरात पाण्यासाठी हाहाकार उडालेला असताना आता नगराध्यक्ष विरुद्ध जनशक्ती आघाडी असा संघर्ष पेटल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या